Uncategorized

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के उत्तर विभाग’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या विभागाच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार नागरी सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के उत्तर विभाग’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या विभागाच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार नागरी सुविधा

संपूर्ण क्षमतेने नागरी सेवा पुरविणारे प्रशासकीय विभाग कार्यालय नागरिकांच्या सेवेत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विभाग कार्यालयाची संख्या पोहोचली २६ पर्यंत

प्रशासकीय विभाग पुनर्रचनेतून नव्याने निर्मित के उत्तर प्रशासकीय विभागाद्वारे संपूर्ण क्षमतेने आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार्‍या सुविधेमध्ये यामुळे भर पडणार आहे. नागरिकांना आपल्या नजीकच्या परिसरात सेवा सुविधा प्राप्त करणे यामुळे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशासकीय विभाग पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या ‘के उत्तर’ या नव्या प्रशासकीय विभागाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल (दिनांक ११ ऑक्टोबर २०२४) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते.

के उत्तर इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. जोगेश्वरी (पूर्व) मध्ये पूनम नगर परिसरातील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडई स्थित या प्रशासकीय कार्यालय लोकार्पण सोहळ्यास खासदार श्री. रवींद्र वायकर, सहायक आयुक्त (के पूर्व) श्री. मनीष वळंजू यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, नव्या विभागासाठी सुरूवातीपासूनच आवश्यक परवानगी, मंजुरी याबाबत महाराष्ट्र शासनाने सर्व सहकार्य केले. सर्व प्रक्रिया पार पडून आज या नवीन विभागाच्या लोकार्पणाची संधी मिळणे, हे मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी भाग्याचे आहे. कारण या नव्या विभागामुळे परिसरातील जनतेची मोठी सोय होणार आहे. नागरिकांना आपल्या घराजवळ असलेल्या कार्यालयात पोहोचून नागरी सेवा सुविधा प्राप्त करता येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रकल्प संपूर्ण महानगर क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते मुंबईतील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून नागरिकांना तसेच पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव मिळाला आहे. मुंबई महानगर स्वच्छ असावे यासाठी सखोल स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात येत आहे. एकूणच मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

खासदार रवींद्र वायकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गत अनेक वर्षांपासून नागरिकांची आपल्या नजीकच्या परिसरात विभाग कार्यालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती. नव्या के उत्तर विभाग कार्यालयातून देण्यात येणार्‍या सुविधेमुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ यात बचत होणार आहे. नागरी सेवा सुविधा पुरवण्याचा वेग देखील वाढणार आहे. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा या कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत, असे खासदार श्री. वायकर यांनी नमूद केले.

के उत्तर विभाग

क्षेत्रफळ – ८.५० चौरस किलोमीटर
लोकसंख्या – ४.२५ लाख
प्रभाग संख्या – ८

विभागातील महत्वाची ठिकाणे

जोगेश्वरी गुंफा
महाकाली गुंफा
लोकमान्य टिळक शामनगर तलाव
मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button