अखिल भारतीय रिपब्लिकन पेक्षा तर्फे तीव्र निदर्शने
अखिल भारतीय रिपब्लिकन पेक्षा तर्फे तीव्र निदर्शने

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गडचिरोलीत निषेध
अखिल भारतीय रिपब्लिकन पेक्षा तर्फे तीव्र निदर्शने
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दुपारी शहरातील इंदिरा गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.
पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने चौकात जमले आणि त्यांनी राज्यसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांनी त्वरित माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
शाह यांनी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान केला असून त्यांना यापुढे महत्त्वाच्या घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे आंदोलक यावेळी म्हणाले. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना उद्देशून लिहिलेले मागण्यांचे निवेदन आंदोलनाच्या ठिकाणीच पोलीस स्टेशन प्रभारी यांना सादर करण्यात आले.
अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनता आणि देशातील आणि जगातील इतर नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सम्रुतवार, प्रा.राजन बोरकर, ज्येष्ठ नेते सुरेखाताई बारसागडे, डॉ.हरिदास नंदेश्वर, जगन जांभुळकर, विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, हेमंत सहारे, युवा प्रमुख नरेंद्र रायपुरे, पुण्यवान सोरते, महिला आघाडीच्या ज्योती उंदिरवाडे, डॉ. अंकिता धाकडे, कल्पना रामटेके, वनमाला झाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा सहारे, तैलेश बांबोडे, विजय देवतळे, साईनाथ गोडबोले, श्यामराव वालदे, भानुदास बांबोडे, अरुण भैसारे, सिद्धार्थ खोब्रागडे, चंद्रभान राऊत यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. त्यात संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत, वीर बाबुराव शेडमाके समितीचे वसंतराव कुलसंगे, माळी समाज संघटने चे हरिदास कोटरंगे, विशाखा महिला मंडळाच्या सुमित्रा राऊत, मनीषा वाळके, शिवनगर महिला मंडळाच्या कविता ढोक व मंगला मेश्राम, समता सैनिक दलाच्या सत्यभामा कोटांगले आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
राजन बोरकर, गडचिरोली प्रतिनिधी