Uncategorized

सिध्दार्थ खरात: ताडशिवणी ते विधीमंडळ, व्हाया मंत्रालय..

सिध्दार्थ खरात: ताडशिवणी ते विधीमंडळ, व्हाया मंत्रालय.. मेहकर:

सिध्दार्थ खरात: ताडशिवणी ते विधीमंडळ, व्हाया मंत्रालय..

मेहकर: जि. बुलढाणा

महायुतीचा गड आला, पण प्रतापरावांचा सिंह गेला!

महाराष्ट्र मिडीया ✍️ संपादकीय

*पराभव, एक असलातरी तो वेगवेगळा असतो. काही पराभव वेदनादायी, काही मनाला चटका लावून जाणारे, काही जिव्हारी लागणारे तर काही पराभव लाजीरवाणे.. मेहकरातील एक पराभव शिवसेनेसाठी सर्व प्रकारात मोडणारा. जिल्ह्यात महायुतीचा गड राखल्या जात असतांना, त्या महायुतीची तीर-कमान ज्यांच्या हाती होती त्या प्रतापरावांचा ‘सिंह’ धाराशायी होणे.. जेवढे वेदनादायी, तेवढेच मनाला चटका लावून जाणारे. हा पराभव तेवढाच जिव्हारी लागणारा, अन् पक्षीय पातळीवर तेवढाच लाजीरवाणा.. अजूनही मेहकरची शिवसेना सदम्यात आहे, अन् रायमुलकर व जाधव परिवार सुन्न. महाराष्ट्रातील सर्वात ‘शुअर’ सीट पडलीय कशी? हेच त्यांना सुचत नाही. पण इथे जिंकले ते सिध्दार्थ खरात, परफेक्ट प्लॅनींग अन् अचूक अंमलबजावणी असली की.. एखादा अभेद्य गडही तरबेज सैन्याच्या नाहीतर अठरागड मावळ्यांच्या सहकार्यावर कसा जिंकला जावू शकतो? हे त्यांनी दाखवून दिले. नजीकच्या सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी या आडवळणी गावापासून काट्या-कुट्याचा तुडवीत रस्ता हा त्यांचा प्रवास व्हाया मंत्रालय ते विधीमंडळ पोहचला आहे आता. जिथं खायला भाकरी नव्हती, तिथं चाकरी व पुढे नोकरी करुन.. झोपडीतला एक पोरगा आमदार होवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं ते जिद्दीने न भिता अन् न डगमगता. बाबासाहेबांचं संविधान काय करु शकते?.. तर ते सिध्दार्थ खरातला करु शकतं, आमदार!*

_गावात आमदार आला अन् त्याची मिरवणूक निघाली की, मला आमदार झाल्यासारखं वाटतं.. या डीजे.च्या गाण्यावर नाचणारा एखादा झोपडपट्टीतला मुलगाही नाचता नाचता वाचायला शिकला की, प्रत्यक्षात आमदार होऊ शकतो.. हे उदाहरण सेट केलंय सिध्दार्थ खरातांनी!_

ताडशिवणी या छोट्याशा गावातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर रस्ता तुडवत ते किनगावराजाला माध्यमिक शिक्षणासाठी जायचे. दरम्यान, शेतात मातेरे गोळा करणे. टेंभुर्णीची पाने विकणे, गोटे फोडणे व १९७२च्या दुष्काळात रस्त्यावर काम करणे.. अशी त्यांची संघर्षाची वाटचाल राहिली. पुढे तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर त्यांनी आताच्या संभाजीनगरला शिक्षण घेत पुढे काही काळ चळवळीत झोकून दिले. गावाकडे परतीचे दोर कापलेले असल्यामुळे व घरी कोणताच आधार नसल्याने त्यांची पावले स्पर्धा परिक्षेकडे वळली व स्वत:ला सिध्द करत त्यांनी मंत्रालयात उच्चपदस्थ नोकरी मिळवली. इथं केवळ त्यांनी काय व किती संघर्षातून मिळवलं, हे नमूद करण्याचा उद्देश इतकाच की.. आधी शिका, मग संघटीत व्हा व पुढे संघर्ष करा.. हा मूलमंत्रच त्यांनी जपला. सोपं नसतं, वातानुकूलीत आयुष्य सोडून आमदारकीसाठी रस्त्यावर उतरणं. पण ते उतरले, त्यांनी उभ्या नोकरीत सुटी खर्च केली ती उत्कर्ष फाऊंडेशनसाठी. या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा जम बसला तो सिंदखेडराजा तालुक्यात. वास्तविक त्यांना तिथूनच विधानसभा लढवायची होती, पण ज्या डॉ.शिंगणेंचे ओएसडी राहिलो.. त्यांचे विरोधात कशी निवडणूक लढणार? या भावनिकतेतून त्यांनी निवडला राखीव असणारा, मेहकर मतदार संघ. गंमत म्हणजे त्यांना या मतदार संघातील पुर्ण गावेही माहित नव्हती, जास्त ओळखही नव्हती !

_सिध्दार्थ खरात ६ महिन्यापुर्वीच फिरायला लागले. यामुळेच आ.रायमुलकर गोटातून त्यांना हलक्यात घेण्यात आले असावे. या मतदार संघात जिथे दिग्गज साहेबराव सरदार, लक्ष्मणराव घुमरे, शहरात रहिवाशी अनंत वानखेडे अशा दिग्गजांना अनुक्रमे ३३ हजार, ३५ हजार व ६२ हजार इतक्या मोठ्या फरकांनी पाडले.. त्यात सिध्दार्थ खरात यांना तर अगदी सहज पाडू, असा समज त्यांचा झाला असावा._

सिध्दार्थ खरात यांनी नुकतेच ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधून हाती मशाल घेतली होती. विशेष म्हणजे उध्दव ठाकरे गटाकडून अनेक दिग्गज बाशींग बांधून तयार होते, त्या विरोधाचा पक्षांतर्गत सामना आधीच त्यांना करावा लागला. त्यानंतर काँग्रेसकडून वासनिकांचे ‘राईटहँड’ लक्ष्मणराव घुमरे यांची बंडखोरी झाली. म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात ४ नोव्हेंबरपर्यंत नाराजांना राजी करण्यात खरात यांची दमछाक झाली. पुढे काय १५ दिवस, संजय रायमुलकरांचा मतदार संघच काय सार्‍या लोकांची नावे तोंडपाठ. सोबतीला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व त्यांचा फौजफाटा, सहकारातील सर्व संस्था सोबत. काँग्रेसवालेच काय उबाठा.वालेही बरेच आतून साथ करायला तयार. त्यात पैशांची चिंता नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. प्रचार यंत्रणा अगदी जोरात. सिध्दार्थ खरात यांच्यासाठी तरी उध्दव ठाकरे यांची सभा पहिल्या टप्प्यात झाली. मात्र प्रचाराच्या मध्यात एकनाथ शिंदेंची सभा ही संजय रायमुलकरांसाठी अगदी दणक्यात झाली. लोणार तालुक्यातील बहुसंख्य वंजारी व ते फुटू नये म्हणून शेवटी शेवटी पंकजाताई मुंडेंना आणण्यात आले. तर इकडे केवळ एक जानेफळची वासनिकांची सभा सोडलीतर, जाहीर सभांची बोंबाबोंब होती. अशा परिस्थितीत शेंबड्या पोरानेही सांगितले असते की, संजय रायमुलकर हमखास निवडून येणार. तसेच सांगितल्या जात होते, सट्टा बाजारात तर रायमुलकरांचे भाव फक्त ५ पैसे होते. नेमकी हीच हवा रायमुलकरांना हवेत नेत होती, तर तिकडे प्रतापराव हेलिकॉप्टर वरून हवेत उडत होते.. मात्र इकडे सिध्दार्थ खरात जमीनीवर होते. अगदी पध्दतशीर नियोजन त्यांचे सुरु होते. सोबतीला हळूहळू जनसमर्थन वाढत होते, विशेष म्हणजे तरुणांना आकर्षीत करण्यात खरात यांचा चेहरा आश्वासक वाटला.

_वंचीत बहुजन आघाडीच्या डॉ.ऋतुजा चव्हाणही रिंगणात होत्या, अगदी त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनीही सभा घेतली. वंचीतला रविकांत तुपकरांचा पाठींबा सांगितल्या जात होता. त्यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणावर सिध्दार्थ खरात यांना होऊ शकतो, अशीही स्थिती होती.. मात्र अभी नही तो कभी नही, ही भावना मागासवर्गीय समाजात खोलवर रुजल्याने त्यांनी वंचीत शेवटी-शेवटी सोडली. त्यामुळे जिल्ह्यात वंचीतला सर्वात कमी २०५४ इतकीच मते मेहकर मतदार संघात मिळाली. मुस्लीम मतांचीही मोठी साथ “मशाल”कडे वळली. परिणाम असा झाला की, सिध्दार्थ खरात १ लाख ४ हजार २४२ मतांवर पोहोचले. तर २०१९च्या निवडणुकीत १ लाख १२ हजार ३८ मते घेतलेले डॉ.संजय रायमुलकर २०२४ला जास्त मतदान होऊनही ९९ हजार ४२३ वरच थांबले. यामुळे सिध्दार्थ खरात यांचा ४,८१९ मतांनी अनपेक्षीत तेवढाच दणदणीत विजय झाला._

 

या विजयानंतर सिध्दार्थ खरात यांची मिरवणूक काढण्यात आली, परंतु ती विरोधी गटाकडून अडविण्यात आली. पहिल्याच दिवशी तणावाची परिस्थिती, खरात यांनी माघार घेऊन होणारा वाद टाळला. नाहीतर त्याचदिवशी ठिणगी पडलेले मेहकर पेटले असते, तसा जाळ निघालाच होता. हा पराभव रायमुलकर समर्थकांच्या जिव्हारी लागणे अगदी स्वाभाविक होते, कारण त्यांनी विजयच नाहीतर मंत्रीपदही गृहीत धरले होते. या स्थितीत होणारा पराभव चटका लावून जाणारच. मूळात संजय रायमुलकर हेही हाडाचे कार्यकर्ते, रस्त्यावर राहून या माणसाने सेवेतून केलेली कामगिरी, अन् आमदार असतांना बाळगलेली कमालीची सौजन्यशिलता ही भावणारी होती. गत अडीच वर्षात त्यांनी हजारो कोटींचा निधी आणून विकास कामांचा धडाका लावला होता. सुख-दु:खात कायम धावून जातांना त्यांनी दिवस-रात्र बघितली नाही. अशा माणसाच्या पराभवाने होणाऱ्या सामूहिक वेदनाही स्वाभाविकच. तशा त्या झाल्याही, तालुक्यातील काही सरपंचांनी सामूहिक राजीनामा देण्याचाही पवित्रा यासाठी उचलला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रायमुलकरांना आता विधान परिषेदत घ्यावे, अशी त्यांनी मागणी आहे !

 

_राजकारणात परिवर्तन अटळ असते, परंतु मेहकर मतदार संघात परिवर्तन व्हायला तब्बल ६ टर्म व ३० वर्ष लागले. ते परिवर्तन केले ते, सिध्दार्थ खरात यांनी. आता त्यांच्याकडूनही मतदार संघाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यांच्या नोकरीची कारकिर्द मंत्रालयात गेलेली असल्याने तिथला काना न् कोपरा त्यांना माहित आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुवर्णाताई या अजूनही मंत्रालयात अवर सचिव आहेत. या सर्व बाबींचा उपयोग मेहकर मतदार संघासाठी व्हावा. निवडणुका झाला असल्याने राजकारण सोडून आता विकासासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर एकत्र येण्याची गरज आहे. कारण प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री आहेत, हरले असलेतरी संजय रायमुलकरांना राजकीय अनुभव आहे व त्यांच्या महायुतीचे सरकार राज्यात आहे. तर नवनिर्वाचीत आमदार सिध्दार्थ खरात यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाशिवाय एक ‘व्हिजन’ आहे, तो दृष्टीकोन मेहकर मतदार संघाला विकासाची ‘दृष्टी’ देणारा ठरो.. कारण मतदार संघात लोणार सरोवराच्या माध्यमातून असलेली भौगोलिक ‘सृष्टी’ ही भारतात इतरत्र कुठेच नाही. तसेही लोणारचे लोणावळा करण्याची घोषणा आ.खरात यांनी केलीच आहे. केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून विकासाची दालने या मतदार संघात आणल्या गेली, तर हा मतदार संघ जगाच्या नकाशावर यायला वेळ लागणार नाही.. म्हणूनच आता राजकारण सोडून हवं, विकासकारण!_

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button