Uncategorizedअपरिचित इतिहासमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान

महानुभाव पंथीयांची ५०० वर्षांची परंपरा असलेले ‘श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर’..

महानुभाव पंथीयांची ५०० वर्षांची परंपरा असलेले 'श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर'..

महानुभाव पंथीयांची ५०० वर्षांची परंपरा असलेले ‘श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर’...

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हदगाव, नांदेड येथील श्रीकृष्णदेव उखळाई मंदिराचा नवपर्व व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उखळाईमायचे दर्शन घेऊन विडाअवसर केले, तसेच श्रीकृष्ण मूर्तीचे अनावरण केले.

जिथे सर्वांची मनोकामना पूर्ण होते, गरिबांना आधार मिळतो आणि दुःखितांच्या वेदनांवर फुंकर मारली जाते, अशी पवित्र जागा म्हणजे ‘श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर’. महानुभाव पंथीयांची 500 वर्षांची परंपरा असलेले हे महत्त्वपूर्ण पीठ आहे. वैराग्यमूर्ती संत दत्ताबापू यांनी या मंदिराचा विकास केल्यामुळे आज या पवित्र मंदिराचे कलशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

पुढे ते म्हणाले, “भारतीय तत्वज्ञानात महानुभाव पंथीयांनी कलशाचे काम केले आहे आणि म्हणूनच आजचा कलशारोपण कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून मराठीला राजमान्यता प्राप्त झाली आहे. या राज्यमान्यतेसाठी विविध पुराव्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे ‘लीळाचरित्र’. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषा किती प्राचीन आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याला केंद्र सरकारनेही स्वीकारले.

“ज्या काळात समाज विषमतेने पोखरलेला होता आणि परकीय आक्रमणांमुळे इष्टदेवांची पूजा करणे देखील कठीण होते, त्याच काळात चक्रधर स्वामींनी महानुभावाचा मार्ग दाखवला. त्यांनी जाती, पंथ, भाषेचा भेद न करता सर्व समाज एक आहे असा संदेश दिला. आजही महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी अफगाणिस्तानपर्यंत महानुभाव विचार पोहोचलेला दिसतो. याचे कारण म्हणजे महानुभाव पंथाच्या विचारातील शाश्वतता,” असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महानुभाव पंथाच्या विविध श्रद्धास्थळांवर अनेक आक्रमणे झाली. परंतु समाजातील लोकांनी या श्रद्धास्थळांचे संवर्धन करून त्यांना जिवंत ठेवले. सध्या राज्य सरकारकडून अनेक श्रद्धास्थळांचे विकासकार्य सुरू आहे. मराठी भाषेतील विपुल ज्ञानसंपदेसाठी रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात आले असून त्याचा पुढील विकास सुरू झाला आहे. येत्या ५ वर्षांत महानुभाव पंथातील प्रमुख स्थळांचा विकास होईल, असाही विश्वास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खा. नागेश पाटील-आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. भीमराव केराम तसेच महानुभाव पंथाचे संत-महंत, मठाधिपती आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button