चामोर्शी शहरातील जिल्हा परिषद केंद्र शाळेजवळ गतिरोधक उभारा
सामाजिक कार्यकर्ते सुधिर गडपायले यांनी केली मागणी

चामोर्शी शहरातील जिल्हा परिषद केंद्र शाळेजवळ गतिरोधक उभारा
सामाजिक कार्यकर्ते सुधिर गडपायले यांनी केली मागणी
गडचिरोली प्रतिनिधी : राजन बोरकर
चामोर्शी : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेजवळ गतिरोधक उभारण्याची मागणी जवळपास दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीकडे केली होती, परंतु नगरपंचायत त्याकडे दुर्लक्ष केले. नगरपंचायतीने तत्काळ गतिरोधकाची उभारणी न केल्यास आंदोलनाचा इशारा व्हाॅईस ऑफ मिडिया तालुका सदस्य तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक तथा माध्यमिक केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधिर गडपायले यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेची केंद्र प्राथमिक शाळा गडचिरोली – चामोर्शी या प्रमुख जिल्हा मार्गालगत आहे. शहरातील हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. यावर गतिरोधक नसल्याने आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. शाळेसमोरील रस्त्यावर देखील अनेक अपघात झाले आहेत. शाळेच्या समोरील रस्त्यालगत अनेकांनी पानठेले लावून अतिक्रमण केले आहे.
तसेच शहरातून जुन्या तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात परिसरातील ये – जा करणारांची मोठी गर्दी असते त्यातच सुरजागड लोह खनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे वाहने याच शाळेच्या समोरुन धावतात करीता या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी शाळा सुरू होताना आणि शाळेची सुट्टी होताना एक वाहतूक नियंत्रण पोलिस नेमणूक करण्यात यावी व या शहरातील शाळे समोर गतिरोधक बसविण्याची मागणी नगरपंचायतीकडे करण्यात आली होती, परंतु नगरपंचायतीने काहीच कार्यवाही केली नाही. गतिरोधक तातडीने न उभारल्यास आंदोलनाचा इशारा सुधिर गडपायले यांनी दिला आहे. या रस्त्यावर गतिरोधकाची गरज आहे, परंतु नगरपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाच्या मार्फत गतिरोधक उभारले नाहीत, शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वाहतूकीचे नियम सांगितले जात आहे पण शिक्षक आणि विद्यार्थीच रस्ता ओलांडताना वाहतूकीचे नियम पाळून रस्ता ओलांडत आहेत त्याकरिता या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलिस आवश्यक असल्याचे सुधिर गडपायले यांनी सांगितले.