मांजरेवाडी प्रकरण : “पीडित तरुणीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा”
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश

मांजरेवाडी प्रकरण : “पीडित तरुणीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा”
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश
पुणे, २० एप्रिल २०
: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात ११ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
ही अमानुष घटना मांजरेवाडीतील नवनाथ मांजरे (वय २९) या नराधमाने केली असून, त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केला. पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली असून सध्या तो २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १३७(२), ६४(१), ६४(२), (एफ), (आय), (एल), (एम), ९६, २३८, सह बालकांचे लैगिंक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेचे कुटुंबीय अत्यंत दु:खी असून त्यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रकरणात सक्षम सरकारी वकील नेमावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी तरुणी एक उज्वल भविष्यासाठी झगडणारी व उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याचे सांगून, तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारने काही तरी करावे, अशी विनंतीही केली.
या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली असून, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याबाबत आणि लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.”
तसेच, राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून, ‘मनोधैर्य योजना’ तसेच इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी असून, अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
याभेटी वेळी संपर्कप्रमुख सारिका पवार, जिल्हाप्रमुख मनीषा परंडे, प्रदूषण महामंडळ सदस्य नितीन गोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.