दिड लाखांच्या विदेशी दारूने भरलेली इंडीका बेवारसपणे सापडली : अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल
गाडी सुरूच होत नसल्याने चोरटे पसार,अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल
तालुक्यातील मलकापूर पांग्रा ते दुसरबीड मार्गावर १ लाख ६९ हजार ९०० रु. किंमतीची विदेशी दारू असलेली एक कार आज दि. २७ जुलै रोजी शनिवारी सकाळी आढळून आली. ही दारू चोरीची असावी व कार बिघडली असल्यामुळे चोरट्यांनी ती रस्त्यावर सोडून पळून गेले असल्यावरुन किनगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचवेळी तालुक्यातील शेंदूरजन येथील बीअर बार अज्ञात चोरट्यांनी फोडून तेथून दारु चोरुन नेल्याची घटना काल रात्री उशीरा ते आज सकाळपर्यंतच्या दरम्यान घडली आहे. हा दारुचा माल त्यातीलच असल्याचेही समजले आहे.
किनगावराजा पोलिसांना पो. कॉं. गणेश वारकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि. २७ जुलै, शनिवारी सकाळी ४.३० ते ५.०० वा. दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी पांढरा रंग असलेली टाटा व्हिस्टा कार क्र. एम. एच. २० बी.सी. २६७८ ज्यामध्ये १ लाख ६९ हजार ९०० रु. विदेशी दारू आहे. ती कार अज्ञात चोरट्यांनी अज्ञात ठिकाणावरुन दारु चोरुन आणली असावी, मात्र ती बिघडून बंद पडल्याने मलकापूर पांग्रा ते दुसरबीड या मार्गावरच सोडून पळून गेले असावेत. त्यावरुन किनगावराजा पोलिसांनी विदेशी दारू व कार चोरी संदर्भात अप. नं. १६९/२४ कलम ३०५ (अ), ३०५ (क) भान्यासं सहकलम ६५ (अ) (इ) मुंपोका अनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याचवेळी तालुक्यातील शेंदूरजन येथील सूर्योदय बार मधील लाखो रुपयांचा विदेशी दारूचा माल काल रात्री उशीरा ते आज सकाळपर्यंतच्या काळात चोरुन नेला आहे. त्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. किनगावराजा पोलिसांनी पकडलेला विदेशी दारूचा माल हा आपल्याच बार मधून चोरलेला असल्याचे बॅच नंबर वरुन सिध्द होत असल्याचे मालक दिलीप शिंगणे यांनी सुद्धा सांगितले आहे