Uncategorized

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी – रानकवी जगदीप वनशिव

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी - रानकवी जगदीप वनशिव

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी – रानकवी जगदीप वनशिव

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सव’ संपन्न

महाराष्ट्र मिडिया न्यूज रिपोर्टर – दिपक पवार

महाविद्यालयीन जीवनातच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले. तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आजपासून सांस्कृतिक विभागाच्या वतीने इंद्रधनुष्य या सात दिवशीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रानकवी वनशिव बोलत होते.

शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्यातील विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पराग चौधरी, सांस्कृतिक विभागप्रमुख व महोत्सवाचे समन्वयक डॉ .दत्तात्रय वाबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

वनशिव म्हणाले की, सध्याचे वर्तमान अस्वस्थ अवस्थेतून जात आहे. आजचा महाविद्यालयीन युवक अनेक समस्यांनी आणि नैराश्याने ग्रस्त आहे, अशा अवस्थेत युवकांना प्रेरणा देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यासाठी इंद्रधनुष्य सारखे सांस्कृतिक उपक्रम निश्चित कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. युवकांची नवी पिढी खूप हुशार असून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. या युवाशक्तीचा योग्य वापर झाल्यास निश्चित समाजाचे भवितव्य उज्वल असल्याचेही रानकवी वनशिव म्हणाले. मराठी भाषा ही समृद्ध आणि सांस्कृतिक वारश्याने नटलेली आहे. अशा आमच्या वैभवशाली मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

महेशबापू ढमढेरे म्हणाले की, शिरूर तालुका सारख्या एकेकाळी ग्रामीण व दुष्काळी असलेल्या भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, बहुजन आणि कामगार वर्गातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने या परिसरामध्ये महाविद्यालयाची स्थापना केली आहे. बघता बघता पंचवीस वर्षांच्या वाटचालीमध्ये हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले. याचा शिक्षण प्रसारक मंडळ परिवारास सार्थ अभिमान वाटत असल्याचे महेशबापू म्हणाले. भविष्यातही संस्थेच्या अनेक योजना असून उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रम साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही महेशबापू ढमढेरे यांनी याप्रसंगी केले.

दि.२६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात सुरू झालेल्या प्रस्तुत युवक महोत्सवामध्ये रांगोळी, फोटोग्राफी, भारतीय वाद्यवादन, नृत्य, नकला, वकृत्व, निबंध, मेहंदी, गीतगायन, रंगकाम, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठावर आणण्याचे आवाहन महेशबापू ढमढेरे व प्राचार्य डॉ.पराग चौधरी यांनी केले आहे.

उद्घाटन समारंभाचे स्वागत व मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख दत्तात्रय वाबळे यांनी करून दिला. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा डॉ संदीप सांगळे हे उपस्थित होते तर डॉ. पद्माकर गोरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button