कु.ज्ञानेश्वरी गडधे व आदित्य गडधे यांची धनुर्विद्या क्रीडा क्षेत्रात गगन भरारी
कु.ज्ञानेश्वरी गडधे व आदित्य गडधे यांची धनुर्विद्या क्रीडा क्षेत्रात गगन भरारी
कु.ज्ञानेश्वरी गडधे व आदित्य गडधे यांची धनुर्विद्या क्रीडा क्षेत्रात गगन भरारी
महाराष्ट्र मीडिया न्यूज रिपोर्टर ‘दिपक पवार’
दौंड, ता.९ : केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी गडधे व आदित्य गडधे यांची ताई पेई चायनीज येथील एशियन आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार कुल यांच्या वतीने स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले.
धनुर्विद्येसारख्या कठीण क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोन्ही भाऊ-बहिणींची निवड होणे ही दौंड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून यासाठी त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राहुल कुल यांनी महिला सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे तालुक्यातील आबाल वृद्धांसाठी पुढील आठवड्यात एक महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी आपण सर्वांनी आरोग्य विषयक जनजागृती करावी असे मत त्यांनी मांडले. हे महाविद्यालय आजच्या काळात सतत उपक्रमशील राहून विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती ठेवून कायमच प्रेरणा देत असते. या दोन्ही भावंडांची प्रेरणा घेऊन असे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात पुढे यावेत असे वाटते. यासाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका आज महत्त्वाची ठरते आहे. अशा क्रियाशील शिक्षकांना त्यांनी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पिढी घडवताना शिक्षकांबरोबरच पालकांची जबाबदारी मोठी असते. अशीच पिढी घडवण्याचे काम ज्ञानेश्वरी व आदित्य यांचे आई-वडील व त्यांचे गडधे कुटुंब करते आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. लवकरच या आजकालच्या युवकांसाठी केडगाव परिसरात एक भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच केडगाव परिसरातील विकासाचा एक मास्टर प्लॅन लवकरच तयार करून त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. असे आमदार राहुल कुल यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, संस्थेचे सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर, प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख डॉ. अशोक दिवेकर, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. विशाल गायकवाड, आप्पासाहेब हंडाळ, दशरथ गरदडे, संतोष आखाडे, ज्ञानदेव गडधे, सतीश हंडाळ तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.