कंपोस्ट खड्डा भरू – आपलं गाव स्वच्छ ठेवू” मोहीमेला भांबोली ग्रामपंचायतीतून सुरुवात
कंपोस्ट खड्डा भरू – आपलं गाव स्वच्छ ठेवू" मोहीमेला भांबोली ग्रामपंचायतीतून सुरुवात

“कंपोस्ट खड्डा भरू – आपलं गाव स्वच्छ ठेवू” मोहीमेला भांबोली ग्रामपंचायतीतून भव्य सुरुवात
खेड, १ मे २०२५ – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी “स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण टप्पा २” अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खेड तालुक्यातील भांबोली ग्रामपंचायत, “साहस” संस्था आणि पंचायत समिती खेड यांच्या विशेष सहकार्यातून “कंपोस्ट खड्डा भरू – आपलं गाव स्वच्छ ठेवू” ही विशेष मोहीम १ मे २०२५ ते २५ सप्टेंबर २०२५ या १३८ दिवसांच्या कालावधीत राबवली जाणार आहे.
या मोहिमेचा उद्देश ग्रामीण भागातील ओला कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करून पर्यावरणपूरक कंपोस्ट खताची निर्मिती करणे हा आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय कर्मचारी यांचा १००% सहभाग अपेक्षित आहे.
या मोहिमेचा प्रारंभ मा. आमदार श्री. बाबाजी रामचंद्र काळे यांच्या हस्ते भांबोली येथे कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाच्या शेडच्या उद्घाटनाने करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार श्री. काळे यांनी सांगितले की, “अशा स्वरूपातील प्रकल्प आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवावेत आणि नंतर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत अशा प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. त्यामुळे एक शाश्वत, स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणनिर्मिती होईल.”
ते पुढे म्हणाले की, “खेड-आळंदी मतदारसंघामध्ये पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. इंद्रायणी नदीचा पाणीप्रश्न, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन यासारख्या बाबींवर संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरच ठोस निर्णय घेतले जातील.”
या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी श्विशाल शिंदे, भांबोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शीतल काळुराम पिंजन, तसेच सहारा संस्था आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही मोहीम ग्रामीण भागात स्वच्छता व पर्यावरण जागृतीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.